ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 2 - पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या सीमाभागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भारताने नियंत्रण रेषा पार केल्यापासून सीमाभागात तणावाचे वातावरण असून, पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबारात काही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमाभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू विभागातील 174 तर सांबा विभागातील 45 शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. " आंतरराष्ट्रीय सरहद्द आणि नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत," जम्मूच्या उपायुक्त सिमरन दीप सिंह म्हणाल्या.
हे आदेश सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना बंधनकारक असेल. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या खौर, जौरियान, मार्ह, आर.एस.पुरा, अरनिया, सतवाती (मंडाल, माखवाल, लाल्याल), अखनूर, बिस्हानाह आणि मिरान साहिब या भागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून निर्माणा झालेल्या अशांततेमुळे काश्मीर खोऱ्यातील शाळा बंद आहेत. तसेच खोऱ्यामध्ये 27 शाळा जाळण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.