Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची माहिती समोर आली आहे. आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढगफुटीमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी किंवा कुणी जखमी झाल्याचं कळू शकलेलं नाही. घटनेवेळी अमरनाथ गुहेजवळ एकही यात्रेकरू उपस्थित नव्हता. याठिकाणी राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) दोन तुकड्या आधीपासूनच तैनात होत्या. याशिवाय या ठिकाणी आता गांदरबलहून एक अतिरिक्त पथक तैनात करण्यात आलं आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचीवर आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी गुंड, कंगन परिसरातील नागरिकांना सिंधू नदीच्या पात्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. कारण सातत्यानं होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. "बाबा अमरनाथ यांच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी संदर्भात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करुन घटनेची माहिती घेतली आहे. बचाव कार्य आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या रवाना करण्यात येत आहेत", असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.