केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. आतापर्यंत २५६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप अनेक लोक मातीखाली अडकले आहेत. असे असताना तिकडे हिमाचल प्रदेशमधून धक्कादायक बातमी येत आहे.
शिमल्यापासून १०० किमी दूर असलेल्या रामपूरच्या झाकडी आणि मंडी जिल्ह्यातील राजवन गावावर प्रचंड ढगफुटी झाली आहे. या पावसामुळे अचानक पूर आला आणि या पाण्यात सुमारे तीस जण वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. रामपूरचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे. तसेच पोलीस, रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमध्ये १९ लोक बेपत्ता झाले आहेत.
रामपूरचे एसडीएम निशांत तोमर यांना रस्ते बंद असल्याने तुकडीसह सर्व यंत्रणा घेऊन दोन किमी पायपीट करावी लागली आहे. दुसरीकडे मंडीच्या द्रंग विधानसभा क्षेत्रातील धम्चयाण पंचायतच्या राजवन दावावरही ढगफुटी झाली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक घरे पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली आहेत. यामध्ये ११ पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे.
या भागातील सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क होत नाहीय. मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते देखील उखडले गेले आहेत. उपायुक्त मंडी अपूर्व देवगन घटनास्थळी रवाना झाले आहेत. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि पाहता पाहता सर्व भागात पाणी घुसले. काही समजायच्या आत लोक यात वाहून गेले, असे तेथील रहिवाशांनी सांगितले.