नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील किन्नौरमधील शलखर गावात ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. ढगफुटीमुळे मोठा पूर येऊन आला आहे. या पुरात जीवितहानी झालेली नाही. पण अनेक वाहनं प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक वाहनं अडकली आहेत. ढगफुटीमुळे डोंगरावरून पुराचं पाणी वेगानं शलखर गावात घुसलं. यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे.
ढगफुटीमुळे पूर आल्याने शलखर गावातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले. पुरात सर्व काही वाहून गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, सामडो चेक पोस्चपासून पूहच्या दिशेने सुमारे सात किलोमीटर अंतरावर ही ढगफुटीची दुर्घटना घडली आहे. निसर्गाच्या कोपामुळे अनेकांची घरं वाहून गेली. सुदैवानं लोकांचे प्राण वाचले. पण ढिगाऱ्याखाली अनेक संसार अडकले आहेत. पुरामुळे परिसरातील मंदिरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली आणि चिखलामध्ये अडकल्या आहेत.
पूर ओसरला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली आहे. तसेच मदतीसाठी आयटीबीपीकडे संपर्क केला आहे. लाहौल पोलिसांनी अलर्ट जारी करून पर्यटक आणि स्थानिकांनी किनौरच्या शलखर गावात ढगफुटी झाल्याची माहिती दिली आहे. रस्ता काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.