दिल्लीसह देशातील अनेक शहरांत पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने देशातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. काल (३१ जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल आणि केरळच्या वायनाडमध्येही भूस्खलन झालं आहे.
हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं. कुल्लूच्या रामपूर भागातील समेजमध्ये असलेल्या पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक लोक ढगफुटीनंतर बेपत्ता आहेत. २० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून वाहनं वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह सापडला आहे तर अनेक जण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला अलर्ट केलं आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन मदतकार्य करत आहे.
हवाई दलासह एनडीआरएफचीही मदत घेण्यात आली आहे. थलटूखोडमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू जिल्ह्यातील रामपूरला लागून असलेल्या १५-२० भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराभोवती ढगफुटीमुळे कुर्पण, समेज आणि गानवी नाल्यांना पूर आला आहे. शिमला जिल्ह्यातील गानवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये पूर आला आहे.
उत्तराखंडमध्ये मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. आधी टिहरीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि नंतर ढगफुटी झाली, त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. केदारनाथ रस्त्यावर ढगफुटी झाल्याने राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग जलमय झाला आहे. रामबाडा येथील मंदाकिनी नदीवर असलेले दोन पूल वाहून गेले. हे पूल जुन्या मार्गावर होते. प्रवासी आणि घोडेस्वार या मार्गाचा शॉर्टकट म्हणून वापर करत होते. काल रात्रीच्या पावसात मंदाकिनी नदीच्या जोरदार प्रवाहाने हे पूल वाहून गेले.