जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारची सकाळ येथील लोकांसाठी भयावह ठरली आहे. या लोंढ्यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
या गावातील अनेक घरे कोसळली असून काही लोक पाण्याच्या वेढ्यामुळे तसेच भूस्खलन झाल्याने घरातच अडकलेले आहेत. या लोकांना वाचविण्याचे काम सुरु करण्यात आले असून आतापर्यंत १०० लोकांना वाचविण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी वाढले आणि अचानक पूर आल्याचे सांगण्यात येत आहे. हे पाणी चिनाब पुलाजवळील धर्मकुंड गावात शिरले. गावात पाणी शिरल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते. या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे १०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. परिसरात पाणी आणि चिखल असल्याने लोक घरातच अडकले आहेत.
रामबन जिल्ह्याच्या उपायुक्तांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या भागात खराब हवामान आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही २४x७ जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०१९९८-२९५५००, ०१९९८-२६६७९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, तसेच सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे. उपायुक्तांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
सध्या देशातील वातावरण बदललेले आहे. फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा प्रत्येक भागात सोसाव्या लागत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अचानक पाऊसही कोसळत आहे. खराब हवामानामुळे गेल्याच आठवड्यात दिल्लीतील अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच येणारी विमाने इतरत्र वळविण्यात आली होती. महाराष्ट्रातही सर्वच भागात पाऊस झाला होता. आता पुन्हा उकडण्यास सुरुवात झाली आहे.