डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. सोमवारी सकाळी पिथोरीगढमधल्या मुनस्यारीमध्ये अचानक ढगफुटी झाल्यानं हाहाकार माजला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात नाल्यात वेगानं पाणी जात असल्याचं पाहायला मिळतंय. ढगफुटी झाल्यानं सेराघाट इथल्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टला नुकसान झालं आहे.वेगानं येणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रोजेक्टच्या डॅमलाही तडे गेले आहेत. तर दुसरीकडे भूस्खलनामुळे हृषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. माहितीनुसार, रविवारी रात्री हृषिकेशमधल्या कुंजापुरी देवी मंदिराजवळ भूस्खलन झालंय. प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य राबवलं जात असून, रस्त्यावरून दरड हटवण्याचं काम सुरू आहे.उत्तराखंडला येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन सचिव अमित नेगीनं भूस्खलन प्रभावित क्षेत्रात बचावकार्यसाठी लागणारी सर्व उपकरणं तैनात केली आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी निपटण्यासाठी आयटीबीपी, एनडीआरएफ, आरोग्य विभाग, पोलीस, लष्कर आणि हवामान खातं एकमेकांच्या संपर्कात आहेत. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या कॅमे-यांचाही वापर करण्यात येतोय. मान्सूनदरम्यान उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
Video- उत्तराखंडमध्ये ढगफुटी, भूस्खलनानं हृषिकेश-गंगोत्री महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 11:54 AM