शिमला/जम्मू : हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये बुधवारी झालेल्या ढगफुटीने आलेल्या जोरदार पुराच्या तडाख्याने १६ लोकांचा मृत्यू झाला. अनेक घरांचे, उभ्या पिकांचे आणि लघु विद्युत केंद्राचे अतोनात नुकसान झाले.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दूरवर्ती गावात पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ढगफुटी झाली. यात ७ जण ठार, अन्य १७ जण जखमी झाले, तर या पर्वतीय राज्यात अचानक आलेल्या पुरात ९ जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत.लडाखमध्ये कारगिलच्या विविध भागात झालेल्या ढगफुटीच्या घटनेने एका लघु विद्युत केंद्राचे, बाराहून अधिक घरांचे आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी संग्रा आणि खंग्राल या भागातील ढगफुटीत जीविहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाल्याकाठच्या १९ घरांचे प्रचंड नुकसान
किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीने नाल्याकाठची १९ घरे, गाईचे २१ गोठे आणि धान्य गोदामाचे नुकसान झाले. होन्जर गावात ढगफुटी झालेल्या भागातील चौदाहून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीने झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गृहमंत्री अमित शहा यांंनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंंग यांच्याकडून स्थितीचा आढावा घेतला.
हिमाचलमध्ये ७ जणांचा मृत्यू, सात बेपत्ता... सतर्कतेचा इशारा जारी
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीतमधील उदयपूरस्थित टोंझिंग नाल्याच्या पुरात सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तीन जण बेपत्ता आहेत. दरम्यान, चम्बामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले. कुल्लू जिल्ह्यात एक महिला, तिचा मुलगा, जलविद्युत केंद्राचा एक अधिकारी आणि दिल्लीच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास लाहौल-स्पितीमधील उदयपूरमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर अचानक पूर आला. दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे. शिमला हवामान केंद्राने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.