चंडीगढ - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकांवरुन चांगलाच गदारोळ माजला असून देशभरातून या विधेयकांला विरोध होत आहे. विशेषत: पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. या विधेयकाला विरोध करतच पंजाबमधील खासदार आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या माजीमंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, आता शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय.
सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता. आता, अकाली दलाच्या एका बॉम्बने मोदी सरकारला हादरा दिलाय, असे बादल यांनी म्हटलंय. गेल्या 2 महिन्यांपासून एकही शेतकरी नेता याबाबत बोलत नव्हता. मात्र, सध्या 5-5 मंत्री यासंदर्भात बोलत आहेत, असेही बादल यांनी म्हटलंय.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित 3 विधेयकांना लोकसभेत आणि संसदेत मंजुरी दिली आहे. मात्र, या विधेयकांतील तरतुदींना पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. या विधेयकांच्या विरोधात पंजाबमध्ये तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच, या शेतीविषयक विधेयकांना स्विकार करणार नसल्याचंही येथील शेतकऱ्यांनी म्हटलंय.