सिद्धूच होणार प्रदेशाध्यक्ष, अमरिंदर सिंग झाले तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:19 AM2021-07-18T08:19:03+5:302021-07-18T08:26:04+5:30
काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी भूमिका स्पष्ट केली.
व्यंकटेश केसरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :पंजाबकाँग्रेसमधील वादावर पुन्हा एकदा तोडगा निघाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य राहील, असे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी भूमिका स्पष्ट केली.
पंजाब काँग्रेसमध्ये यामुळे दुफळी निर्माण झाली आहे. हा वाद सोनिया गांधींपर्यंत पोहोचला होता. बऱ्याच बैठका आणि चर्चेनंतर सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यास अमरिंदर सिंग यांनी विरोध केला होता. या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. पक्षातील हिंदू नेते नाराज होतील, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगण्याचा प्रयत्न केला.
समितीने काढला मार्ग
पंजाबच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून सिद्धू यांना मोठी जबाबदारी दिली आहे. या निर्णयानंतर सिद्धू यांनी मंत्री तसेच आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवातही केली आहे.