Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:15 AM2020-02-11T10:15:57+5:302020-02-11T11:01:31+5:30
Delhi Assembly Election Results Updates: निवडणूक निकालाआधी अरविंद केजरीवालांचं कार्यकर्त्यांना आवाहन
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली. निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नका, असं आवाहन केजरीवालांनी केलं आहे. दिल्लीतलं प्रदूषण वाढू नये, यासाठी केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे.
दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार असल्याचा विश्वास असल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. आपच्या मुख्यालयातून मिठाईची ऑर्डर देण्यात आली आहे. सर्वच एक्झिट पोल्सनी दिल्लीत आपचंच सरकार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच आपनं मोठी मुसंडी मारली. सध्या आप ५० जागांवर पुढे असून भाजपानं २० मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आपनं तब्बल ६७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे याआधी केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार चालवत होते. त्यानंतर निवडणुकीला सामोरं जात आपनं दणदणीत बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं. आपच्या लाटेत भाजपाचा पालापोचाळा झाला. या निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागा मिळाल्या. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.