नवी दिल्ली: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे अवघा देश राममय झाला आहे. अशातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीने राजधानी दिल्लीत सुंदरकांड पाठाचे आयोजन केले आहे. स्वतः सीएम केजरीवाल आपल्या पत्नीसह रोहिणी येथील प्राचीन श्री बालाजी मंदिरात पोहचले आणि सुंदरकांड पाठत सहभागी झाले.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी संपूर्ण दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी घोषणा आम आदमी पक्षाने 15 जानेवारी रोजी केली होती. त्यानुसार, हा उपक्रम आज(दि.16 जानेवारी) पासून सुरू झाला आहे. यानुसार, दिल्लीतील सर्व विधानसभांमध्ये सुंदरकांड आयोजित केला जाईल. पक्षाच्या निवेदनानुसार, आमदार आणि नगरसेवक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुंदरकांड आयोजित करतील.
राम मंदिरावरुन देशात राजकारण 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनावरुन देशात राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्ष या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्षांनी केला आहे. अशातच राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप मागे पडण्याच्या भीतीने आम आदमी पक्षाने सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
'आप'च्या आयोजनावर भाजपची टीकादिल्लीतील आपने आयोजित केलेल्या सुंदरकांड पाठावर भाजपचे प्रवक्ते बन्सुरी स्वराज यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांना प्रभू राम आणि सुंदरकांड आठवतो. यापूर्वीही त्यांनी एमसीडी निवडणुकीपूर्वी सुंदरकांड पठण करण्याची घोषणा केली होती आणि आता ते लोकसभा निवडणुकीपूर्वी सुंदरकांड पठण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.