नवी दिल्ली-
आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कट्टर देशभक्ती, प्रमाणिकपणा आणि मानवता हे आम आदमी पक्षाच्या विचारधारेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत, असं केजरीवाल म्हणाले. रोजगाराचा प्रश्न स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. रोजगाराची चर्चा निवडणुकीपूर्वीच व्हायची आणि निवडणुकीनंतर लोक विसरायचे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा अर्थसंकल्प रोजगारावर करण्यात आला आहे. हा माफक अर्थसंकल्प नसून ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
"कोणत्याही राजकीय पक्षानं निवडणुकीपूर्वी ५ वर्षांत २० लाख नोकऱ्या देण्याचं धाडस केलं नाही. शाळा, विजेप्रमाणेच आता इतर पक्षांनाही रोजगारावर चर्चा करावी लागणार आहे. जेव्हा सिग्नलजवळ वाहनं थांबतात तेव्हा मुलं भीक मागताना दिसतात. लहान मुलं रस्त्याच्या कडेला साहसी खेळ करताना दिसतात. त्यांना प्रशिक्षण मिळाल्यास ते ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकतात. अशा मुलांसाठी आम्ही बोर्डिंग स्कूल बनवू", असं केजरीवाल म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आयकर विभागातील नोकरी सोडून झोपडपट्टीत राहायला लागलो तेव्हा तेथील परिस्थिती जाणून घेतली. जीटीबी हॉस्पिटलची अवस्था बिकट होती. औषधं उपलब्ध नव्हती. आज दिल्लीत गरीब असो की श्रीमंत, तुम्ही सरकारी रुग्णालयात मोफत चाचण्या आणि उपचार घेऊ शकता. आता गरीब व्यक्तीला उपचारासाठी स्वत:ला विकण्याची गरज भासत नाही"
"रेशन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांना घरोघरी वितरण प्रणाली लागू करता आली नाही. केंद्र सरकारनं मला ही योजना लागू करू दिली नाही. या देशात आजवर जी काही सरकारं स्थापन झाली ती सर्व कामं बंद पाडण्यासाठी केली गेली आहेत. जनतेची कामं थांबवणं हे या सरकारचं काम झाले आहे. जनतेसाठी काम करणारं 'आप' हे पहिले सरकार आहे", असा दावा केजरीवाल यांनी केला.