बिहारमध्येनितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आणि राजदसोबत सरकार स्थापन केले आहे. यानंतर आता, आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या अहंकारामुळेच त्यांचे मित्रपक्ष त्यांना सोडून जात आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी रावणाच्या अहंकाराचेही उदाहरण दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, "बिहारमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावरून भाजप प्रचंड अहंकारी होत असल्याचे दिसून येते. त्याच्या अहंकारामुळे जनताही त्याच्यावर नाराज होत आहे आणि देशभरात मित्र पक्षही त्यांची साथ सोडत आहेत. शिवसेनेने त्यांची साथ सोडली आहे. अकाली दलानेही त्यांची साथ सोडली आहे आणि आता जेडीयूनेही त्यांची साथ सोडली आहे.
केजरीवालांनी दिलं रावनाचं उदाहरण - केजरीवाल म्हणाले, अहंकार तर रावणालाही होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर एक गोष्ट अत्यंत महत्वाची असते. आपल्याला विनम्र व्हावे लागते. आपल्याला जनतेसमोर हात जोडून नम्रतेने काम करावे लागते. मात्र, जेव्हा आपल्यात अहंकार येतो तेव्हा पतन सुरू होते.''