नवी दिल्ली : 2022-2023 या आर्थिक वर्षात मिळालेल्या बजेटमधून देखभालीच्या कामांसाठी दिल्लीपोलिसांना मिळालेल्या निधीत 350 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला आहे. देखभाल-दुरुस्तीच्या छोट्या कामांच्या नावाखाली 150 कोटी आणि व्यावसायिक सेवेच्या नावावर सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरपूस समाचार घेत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पंतप्रधान जी, दिल्ली पोलिस तुमच्या अखत्यारीत येतात का? आता दिल्ली पोलिसांच्या या घोटाळ्याची चौकशी होणार का? दोषींना शिक्षा होऊन तुरुंगात जाणार का?"
आयुक्तांनी मागितलला खर्चाचा संपूर्ण अहवालदिल्ली पोलिसांच्या गृहनिर्माण महामंडळाच्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघड झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. आयुक्तांकडून तपासाच्या सूचना मिळाल्यानंतर तरतूद आणि वित्त विभागाचे विशेष आयुक्त लालतेंदू मोहंती यांनी जिल्ह्यात आणि विविध युनिटमध्ये तैनात असलेल्या 40 डीसीपी आणि अतिरिक्त डीसीपींकडून आतापर्यंत झालेल्या सर्व खर्चाचा अहवाल मागवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व डीसीपींना विचारण्यात आले आहे की, व्यावसायिक सेवांचा निधी कसा आणि कोणत्या कामासाठी वापरला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हे आणि युनिट्सच्या डीसीपींनी व्यावसायिक सेवांचा निधी आवश्यक कामांसाठी खर्च करण्याऐवजी पोलिस ठाणे, पोलिस वसाहती आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी, रंगरंगोटीसारख्या छोट्या कामांमध्ये सर्वाधिक खर्च दाखवला आहे.