CM Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आज त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांनी केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या दोन दिवसांत विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, अशी माहिती केजरीवालांनी दिली. आता प्रश्न पडतो की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याची जबाबदारी कोणाकडे असते? किंवा सरकार कोण चालवते? जाणून घ्या...
मुख्यमंत्र्यांचा राजीनामादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा जाहीर केला आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत मी जनतेच्या कोर्टात जिंकत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही. दिल्लीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. जनतेने कौल देऊन मला विजयी केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. मात्र, दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' पाच नावे चर्चेतअरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राखी बिर्ला यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राखी बिर्ला या अनुसूचित जातीचा चेहरा असून मागासवर्गीयांना लक्षात घेऊन त्यांना खुर्ची दिली जाऊ शकते. याशिवाय, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचेही नाव पुढे जात आहे. तिसरे नाव सौरभ भारद्वाज यांचे आहे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सरकारच्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्लीचे परिवहन आणि पर्यावरण मंत्री कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्य कोण चालवते?अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत राज्याचा कारभार कोण पाहणार आहे. माहितीनुसार, कोणताही मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल/नायब राज्यपालांकडे सोपवतो. परंतु राजीनामा दिल्यानंतर आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत, विद्यमान मुख्यमंत्री राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम सांभाळतात. मुख्यमंत्री राजीनामा देतात, तेव्हा राज्यपाल/नायब राज्यपाल नवीन मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत राज्याची जबाबदारी सांभाळण्याचे निर्देश देतात.
राष्ट्रपती राजवटआता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी कोण सांभाळते. राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी राज्यपाल/नायब राज्यपालांकडे असते आणि ते राज्याशी संबंधित सर्व कामांसाठी जबाबदार असतात. मात्र, कार्यवाह मुख्यमंत्र्यांचे अधिकार मर्यादित होतात. या कालावधीत ते कोणतीही नवीन योजना सुरू करू शकत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे अशा बाबींवर ते सूचना देऊ शकतात.