दिवाळी : राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी, गेहलोत सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 09:03 AM2020-11-02T09:03:20+5:302020-11-02T09:23:54+5:30
फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय लग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले.
जयपूर -राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी, फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर फिटनेस शिवाय धूर सोडणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश गेहलोत सरकारने दिले आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, कोरोना महामारीच्या या आव्हानात्मक काळात राज्यातील नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कोरोनाबाधितांबरोबरच हृदय आणि श्वासनाची समस्या असणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागतो, यामुळे, दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये. एवढेच नाही, तर त्यांनी फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय लग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले.
गेहलोत यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवास स्थानी राज्यातील कोरोना स्थितीचा आणि ‘नो मास्क-नो एंट्री’ आणि ‘शुद्धतेसाठी युद्ध’ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनलॉक-6च्या गाईडलाइंसवरही चर्चा केली. तसेच काही दिशा-निर्देशही दिले.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या विकसित देशांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. अनेक देशांना तर पुन्हा लॉकडाउनची घोषणा करावी लागली आहे. आपल्याकडेही अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आपणही सावधगिरी बाळगायला हवी.
ड्रायव्हर्सना आवाहन -
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वाहन चालकांना आवाहन केले आहे, की त्यांनी सिग्नलवर लाल लाईट लागताच वाहने बंद करावीत. तसेच, प्रदूषणाच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. एखाद्या वाहनाचे फिटनेस असतानाही ते प्रमाणापेक्षा अधिक धूर सोडताना दिसल्यास, संबंधित फिटनेस सेंटरवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही गेहलोत यांनी दिले आहेत.