Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर बोम्मई यांनी आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे पुनरुच्चार केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्याच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच दोन्ही राज्यातील जनता सुखाने, समाधानाने राहिली पाहिजे. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, असे बोम्मईंना सांगण्यात आले. एवढेच नाही तर दोन्ही मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात भेटणार असल्याचे सामंत म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याच्या काहीच तासांत बोम्मई यांनी ट्विट करत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असले तरी कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात चालवली जाईल, असे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले आहे.
दरम्यान, कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"