पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. 23 मार्च शहीद दिनानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक (भ्रष्टाचार विरोधी) हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. राज्यातील जनतेला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवता येतील असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच पंजाबच्या जनतेसाठी भगवंत मान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
"23 मार्च, शहीद दिनानिमित्त मी हेल्पलाइन सुरू करेन जो माझा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असेल. पंजाबमध्ये, कोणी तुमच्याकडून लाच मागितल्यास, नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्या नंबरवर पाठवा. माझे कार्यालय त्याची चौकशी करेल आणि कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही", असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
पंजाबच्या जनतेच्या हितासाठी आज एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही तासांपूर्वी दिली होती. मान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबच्या इतिहासात आतापर्यंत कोणीच असा निर्णय घेतलेला नसेल. काही वेळातच घोषणा करेन, असं मान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मान यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मान यांनी पहिलंच पाऊल भ्रष्टाचाराविरोधात टाकून थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रार निवारण करणार असल्याची घोषणा करत मोठं गिफ्ट राज्याच्या जनतेला दिलं आहे.