नवी दिल्ली - कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नाटकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे तब्बल 25 आमदार मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय भुकंप होतो की काय, अशा शक्यता निर्माण झाली आहे.
नाराज आमदारांनी बैठक बोलविली होती. माजी उपमुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक पत्र प्रसिद्ध कऱण्यात आले आहे. मात्र या पत्रावर कोणाचेही हस्ताक्षर नाही. त्यामुळे या पत्राच्या विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान न्यूज 18 लोकमतला एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर राज्यात येडीयुरप्पा यांचे चिरंजीवच सुपर सीएम झाल्याचे म्हटले. यानंतर काँग्रेस नेत्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. जेंव्हा असंविधानिक काम करून सत्ता स्थापन करण्यात येते. त्यावेळी असं होणारच आहे. येडीयुरप्पा आजपर्यंत कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत, असं काँग्रेसनेते बृजेश कलप्पा यांनी सांगितले.
कर्नाटकच्या राजकारणात येडीयुरप्पा यांच्या वाढत्या वयाची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपमध्ये 75 वर्षापर्यंतच नेत्याला पदावर कायम ठेवण्यात येते. येडीयुरप्पा यांचे वय 77 झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.