Jharkhand Assembly Trust Vote: हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ आहे. विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (ML) एकूण ४६ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे २८, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआय (एमएल)च्या एका आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि मित्रपक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत. विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकू असा विश्वास झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले.
चंपई सोरेन सरकारच्या समर्थनार्थ किती मते मिळाली?
झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंजुरी देण्यात आली होती. ४७ मतांसह चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधात २९ मते पडली. तत्पूर्वी विधानसभा सभागृहात बोलताना हेमंत सोरेन यांनी भाजपा, केंद्र सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली.
हेमंत सोरेन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले
विश्वासदर्शक ठरावाच्यापूर्वी बोलताना नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सांगितले की, विरोधकांनी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीत हेमंत सोरेन सरकारने चांगले काम केले. हेमंत सोरेन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली झारखंड पुढे गेले. हेमंत असेल तर हिंमत आहे. ज्या कुटुंबात शिक्षणाचा दिवा कधीच पेटला नाही, अशा कुटुंबात आम्ही दिवा लावू. हे चुकीचे आहे का? केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हेमंत सोरेन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. आमच्या योजना कोणीही पुसून टाकू शकत नाही. आम्ही अभिमानाने सांगू की, आम्ही भाग-२ आहोत.
घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन
मी आदिवासी आहे, त्यामुळेच टार्गेट केले जात आहे. पहिल्यांदाच देशाच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. हार मानली नाही. आदिवासी दलितांबद्दल द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्हाला जंगलात जाण्यास सांगितले जात आहे. जर ते शक्य झाले तर ते आम्हाला जंगलात पाठवतील. अश्रू ढाळणार नाही. जमीन माझ्या नावावर आहे, हे सिद्ध करण्यासाठी माझे अश्रू सावरीन. माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. मला तुरुंगात डांबून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकणार नाहीत. रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर रामराज्य आल्याचे बोलले जात आहे. पहिलेच पाऊल हे एका मुख्यमंत्र्याला संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले, या शब्दांत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हल्लाबोल केला.