Punjab Election 2022: चरणजीत सिंग चन्नी 'या' दोन जागांवर लढणार? काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:06 PM2022-01-11T15:06:42+5:302022-01-11T15:11:51+5:30
Punjab Election 2022: उद्या (बुधवारी) काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते. या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचेही नाव असू शकते.
चंदीगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीबाबत (Punjab Assembly Election) एक मोठी बातमी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवू शकतात. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पंजाबमधील चमकौर साहिब आणि आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सध्या चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
दरम्यान, उद्या (बुधवारी) काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते. या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचेही नाव असू शकते. निवडणूक आयोगाने पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पंजाबमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. नवज्योतसिंग म्हणाले की, पंजाबमध्ये आता काँग्रेस मॉडेल चालवले जाईल. माफिया मॉडेल यापुढे चालणार नाही. पंजाबमध्ये सर्व प्रकारचे खाणकाम केले जाते. आतापर्यंत माफिया राजवट सुरू होती. माफियांनी सरकारची धोरणेही राबवू दिली नाहीत.
याचबरोबर, पंजाबमध्ये वाळू-माफियांची दहशत होती. त्यामुळे वाळूचे दर ठरवावे लागतील. जेव्हा प्रत्येक गोष्टीची किंमत ठरलेली असते तेव्हा वाळूचीही असायला हवी. वाळूचे दर ठरवले असते तर प्रश्नच नव्हता. वाळू डिलिव्हरीसाठी ऑनलाइन बुकिंग असावे, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले.