उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी टाळली का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:25 IST2024-12-12T15:25:10+5:302024-12-12T15:25:16+5:30
CM Devendra Fadnavis News: मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी टाळली का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
CM Devendra Fadnavis News:देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गेलेले नाहीत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
विशेष विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली गाठली. तर काही वेळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही दिल्लीत गेले. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम करण्यासाठी नेते दिल्लीत गेल्याची चर्चा होती. परंतु, एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदेंची नाराजी अजून दूर झाली नाही का, गृहखाते आणि अपेक्षित मंत्रिपदे मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे का, महायुतीत सगळे आलबेल नाही, अशा नाना चर्चा आणि शक्यतांना पेव्ह फुटले होते. दिल्लीत पत्रकारांशी बोलातना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
अजित पवार आणि तुम्ही दिल्लीत असताना एकनाथ शिंदे सोबत का आले नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले आहेत. मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. एकनाथ शिंदेंचे लगेच इथे काही काम नसल्यामुळे आलेले नाहीत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत अशा चर्चांमध्ये अर्थ नाही. माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झालेली नाही. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलो आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय आमचे संसदीय मंडळ, नेते घेतात. चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतली. मंत्रिपदांबाबत चर्चाही केली आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला आपण मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे. आता वरीष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तुम्हाला लवकरच कळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.