देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील मनाने अटलजींना वाहिलेली ही शब्दांजली.....
मी सुन्न आहे. बाहेरुन स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आतून कोसळून गेलो आहे. श्रद्धेय अटलजींच्या कितीतरी आठवणी दाटून येत आहेत. नागपुरात जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. अटलजींसह देशातील सर्व मान्यवर नेते नागपुरात आले होते. अटलजींचे वडीलांशी स्रेहाचे संबंध होते. मी त्यांना भेटायला गेलो. आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण हिम्मत होत नव्हती. तसे मी वडिलांना सांगितलेही. पण काही कारणाने पहिल्या दिवशी ते साध्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी मग मी प्रमोदजींकडे आग्रह धरला. प्रमोदजींनी अटलजींना विनंती केली आणि त्यांनी होकार दिला. त्याचवेळी माझे वडील तेथे आले, तेव्हा अटलजी वडीलांना उद्देशून म्हणाले ‘दो शेरो के बिच मे मै खडा हू’ अटलजींच्या या कौतुकाने मी अक्षरश: भारावून गेलो होतो.वडील आजारी असताना ते दोन वेळा त्यांना भेटायला आले होते. प्रत्येक भेटीत त्यांची विनम्रता, साधेपणा मी आत्मसात करीत होतो. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात अमाप जिव्हाळा असल्याचे जाणवत होते. त्या वयात फार कळत नव्हते. पण या अनुकरणीय वयात होणारे संस्कार नकळत माझ्यावर होत होते. देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. ऋषीतुल्य माणसाच्या अशा आशीर्वादाचे आपल्या आयुष्यात फार मोठे बळ असते. पण ती व्यक्ती निघून गेली की, आयुष्यात एक पोरकेपण येते. ते दु:ख कुणाला सांगता येत नाही. आयुष्यभर ती पोकळी कधी भरुनही निघत नाही.