लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तातडीने दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप श्रेष्ठींसोबत दीर्घ चर्चा केली. दिल्लीत दाखल होताच शिंदे-फडणवीस सुरक्षा रक्षकांना सोडून अज्ञातस्थळी रवाना झाल्यामुळे मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित इतर विषयांवर दिल्लीत चर्चेत नेमके काय शिजले याविषयी उत्सुकता हाेती.
बैठक कुठे, अंदाज लागेना
आज सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमाराला दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना हुलकावणी दिली. नेहमीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६ अ, कृष्ण मेनन मार्ग निवासस्थानी त्यांची बैठक होईल, अशी अपेक्षा होती. पण, खुद्द अमित शाहच आपल्या निवासस्थानाहून ताफा घेऊन बाहेर पडले. परंतु, बैठक कुठे सुरू आहे याचा चार तासांनंतरही थांगपत्ता लागू शकला नव्हता.