महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मोठ्य़ा उत्साहात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी केली जात असल्याचा मला आनंद आहे असं म्हटलं आहे. तसेच नवीन संसद भवनावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. "कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं" असं म्हणत एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे. देशाचं नाव जगभरात मोदी साहेबांनी रोशन केल्याचं म्हटलं आहे.
"या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, सर्व जण तिथे आले होते. सर्व जातीपाती-धर्माचे लोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे.
"2024 ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील"
देशात लोकशाही टिकवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असे आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर "लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र? 2019 ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले. 2014 पेक्षा 2019 ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या. 2024 ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. 140 कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत. 2024 ला सगळे रेकॉर्ड मोडतील" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"भव्य-दिव्य इमारत सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी, सामर्थ्याला नवी गती, बळ देईल"
नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची नवीन इमारत बांधणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदींनी सन्मान केला. "आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही भव्य-दिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.