भारत आणि इंडिया या नावांवरून सध्या देशात जबरदस्त वाद सुरू झाला आहे. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही उडी घेत राहुल गांधींना थेट प्रश्न विचारला आहे. G-20 च्या निमंत्रणासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. या पत्रात 'भारताचे राष्ट्रपती' असे म्हणण्यात आले आहे.
हिमंता म्हणाले, विरोधी पक्ष आधीच हिंदुत्व नष्ट करण्याचा कट आखत आहे आणि आता ते भारतासंदर्भातही असेच बोलत आहेत. विरोधकांनी सर्वप्रथम राहुल गांधींना विचारावे की, त्यांनी भारत जोडो यात्रेऐवजी इंडिया जोडो यात्रा का नाही काढली?आम्ही भारत म्हणतो. हे लोक आक्षेप घेतात आणि जेव्हा त्यांचे युवराज भारत म्हणतात, तर त्यांना काहीच अडचण होत नाही?
एक्सवरूनही केला हल्लाबोल - तत्पूर्वी एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करताना हिमंता म्हणाले, होते, असे वाटते की, काँग्रेसला भारताबद्दल तीव्र नापसंती आहे. 'भारता'ला बदनाम करण्याच्या उद्देशानेच विरोधी आघाडीने जाणीवपूर्वक 'इंडिया' नाव निवडले. रिपब्लिक ऑफ भारत-आनंद आणि अभिमान आहे की, आपली सभ्यता अमृत काळाकडे मजबुतीने वाटचाल करत आहे.