भोपाळ - छिंदवाडा परिसरात असलेल्या सौंसर गावाजवळ बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावर कारवाई केल्याप्रकरणी अनेक वाद निर्माण झाले. शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर जेसीबीने कारवाई करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातही उमटले.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्याची येईल असं सांगितले आहे. तर कमलनाथ यांचे चिरंजीव असलेले खासदार नकुलनाथ यांनी शिवाजी महाराज पुतळा बनवणे आणि त्याची स्थापना करणे यासाठी जो काही खर्च लागेल तो स्वखर्चातून करु अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर छिंदवाडामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये जो राग होता तो शांत करण्यात मध्य प्रदेश सरकारला यश आलं आहे.
छिंदवाडाच्या मोहगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जेसीबी मशीनच्या सहाय्याने हटवण्यात आला होता. त्यावरुन परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवप्रेमींनी याविरोधात आंदोलन केलं होतं. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. या संपूर्ण तणावाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे गौरवर आहे. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना मोठ्या उत्साहाने होणं गरजेचे आहे. रात्रीन चोरून अशाप्रकारे करणं योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना छत्रपतींचा प्रतिमा पुन्हा स्थापित करण्याची परवानगी द्यावी असे आदेश दिले. तर खासदार नकुलनाथ यांनी स्वखर्चातून हा सर्व खर्च करतील असं सांगण्यात आलं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावरुन भाजपाने काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला होता.
तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेसवर निशाणा साधला. मध्य प्रदेशमधल्या छिंदवाड्यामध्ये आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाताहत आणि विटंबणा करण्यात आली. त्याचा भारतातील प्रत्येक व्यक्ती निषेध करतो आहे. छत्रपतींचा हा अपमान भारत देश कधीच सहन करणार नाही. याबाबत मध्य प्रदेश सरकारनं माफी मागितली पाहिजे. त्याठिकाणी महाराजांचा पुतळा पूर्ण सन्मानानं उभा केला पाहिजे, अशी आमची मागणी त्यांनी केली होती.