नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ममता बॅनर्जी संतापल्या आणि दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी यांची भेट घेतलीच पाहिजे असे भारतीय घटनेत लिहिले आहे का, अशी खोचक विचारणा ममता दीदींनी केली.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रातील वाढ आणि त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचा पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखत असून, त्यादृष्टीने पावले उचचली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले. दिल्लीत आल्यावर मी केवळ पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. सगळे नेते आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यस्त आहेत. ठरवलेल्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्यावर भर जास्त आहे. दिल्लीत आल्यावर प्रत्येक वेळी सोनिया गांधी यांची भेट का घ्यायची, सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का, अशी खोचक विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. तसेच उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काही मदत हवी असल्यास तृणमूल काँग्रेस त्यासाठी तयार आहे. अखिलेश यादव यांना काही मदत हवी असल्यास आवश्य सांगावे, असेही त्या म्हणाल्या.
मेघालयमध्ये काँग्रेसला भगदाड
ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये घाऊक प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, ३० नोव्हेंबरला ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. १ डिझेंबरला बिझनेस इव्हेंटमध्ये त्या सहभागी होतील. ममता बॅनर्जी या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.