कोलकाता - पश्चिम बंगालमधील विजयानंतर टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. यातच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अभिनंदनपर संदेशावरही प्रतिक्रिया दिली. "एखाद्या पंतप्रधानांनी फोन न करणे, असे पहिल्यांदाच घडले आहे," असे ममतांनी म्हटले आहे. (CM Mamata Banerjee on congratulatory message from pm Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच ट्विट करून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले होते. या ट्विटमध्ये मोदी म्हणाले होते, "बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचे अभिनंदन. केंद्र सरकार लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोना महामारीवर मात करण्यासाठी बंगाल सरकारला शक्य ती सर्व प्रकारची मदत सुरू ठेवेल."
याच बरोबर मोदींनी, "आमच्या पक्षाला आशिर्वाद दिलेल्या पश्चिम बंगालमधील माझ्या बहीण-भावांचे मी आभार मानतो. पूर्वीच्या तुलनेत आता बंगालमध्ये भाजपची शक्ती वाढली आहे. भाजप जनतेची सेवा करत राहील. मी निवडणूकीत पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करतो," असेही म्हटले होते.
तत्पूर्वी, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर ममता होत्या, तर ममतांच्या निशाण्यावर मोदी होते.
या निवडणुकीत तृणमूलला मोठा विजय मिळाला आहे. तृणमूलने 292 जागा जिंकल्या आहेत. तर 200 प्लसचे लक्ष्य ठेऊन चाललेल्या भाजपला केवळ 77 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (TMC)ला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ 3 जागाच मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 आणि डाव्या पक्षांना 26 जागा मिळाल्या होत्या.