कोलकाता - कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालच्या ममता सरकारला मोठा धक्का दिला आहे. बनावट सरकारी नोकरी घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या राखल बेरा यांना तत्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राखल बेरा हे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय आहेत.
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे, की माणिकतला पोलीस ठाण्यात सुजित डे नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून राखल बेरा यांना त्याच्या निवासस्थानाबाहेरून अटक करण्यात आली होती. सुजीत डे यांनी बेरा आणि इतर काही लोकांवर राज्याच्या सिंचन आणि जलमार्ग विभागात नोकरीचे आश्वासन देऊन लोकांना फसवल्याचा आरोप केला होता.
'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा
पोलिसांना दिलेल्या निवेदनात तक्रारदाराने म्हटले आहे की, आरोपी राखल बेरा याने जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान कोलकाता येथील माणिकटोला रोडवरील साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये शिबिराचे आयोजन केले होते. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी पश्चिम बंगाल सिंचन आणि जलमार्ग विभागाच्या 'ग्रुप डी'मध्ये (फील्ड स्टाफ) नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमवले आहेत.
याशिवाय, तक्रारदाराने असाही आरोप केला आहे, की आरोपीने त्याच्याकडून 2 लाख रुपये घेतले आहे, परंतु 2019 मध्ये आयोजित केलेल्या शिबिरादरम्यान आश्वासन देण्यात आलेली सरकारी नोकरी दिली नाही.