नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी ममतांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि लसीचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'आज पंतप्रधानांसोबत शिष्टाचार बैठक झाली. या बैठकीत मी राज्यातील कोरोना स्थिती आणि अधिक लसी तसेच औषधांचा मुद्दा उपस्थित केला. याच बरोबर मी प्रलंबित असलेला राज्याचे नाव बदलण्याचा मुद्दाही उपस्थित केला. यावर, ते या प्रकरणांवर लक्ष देतील, असे त्यांनी म्हटले आहे.' (CM Mamata Banerjee meets PM Narendra Modi)
यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सोमवरपासून पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतल्यानंतर हा ममतांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
ममता बुधवारी दहा जनपथ येथे सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. अभिषेक मनू सिंघवींसह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना त्या भेटणार असल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26-30 जुलैदरम्यानच्या आपल्या दौऱ्यात ममता बॅनर्जी संसदेतही जाऊ शकतात. सथ्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच बरोबर, त्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अँटी-बीजेपी फ्रंट तयार करण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत.
बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट -टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्यानुसार, दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेऊ शकतात. तसेच यासाठी त्यांनी निमंत्रणही पाठविले आहे.