कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करत आहे. याच बरोबर राजकीय वक्तव्यांशिवाय राजकीय हिंसाचाराच्या घटनाही समोर येत आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात ममतांनी मोदी सरकारकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व महत्वाचे दस्तऐवज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी यासंदर्भात आपले पत्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांशी संबंधित माहिती दिली. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणाही केली. त्या म्हणाल्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 'देश नायक दिवस' साजरा केला जाईल.
ममता म्हणाल्या, वैयक्तिकपणे मला असे वाटते, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी काहीही महत्वाचे कार्य केलेले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, यासाठी मी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे आणि ही माझी मागणी आहे. याच बरोबर, अनिवासी भारतीयांसह देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते, की नेताजींच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 23 जानेवारीला दुपारी 12:15 वाजता सर्वांनी शंख नाद करावा, असेही ममता म्हणाल्या.
शेतकऱ्यांना समर्थन - यावेळी ममता म्हणाल्या, मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि हे तीनही कृषी कायदे परत घेण्याची मागणी करते. तसेच भाजपची राजकीय इच्छा स्पष्ट आहे, म्हणूनच ते हे कायदे मागे घेत नाहीत, असेही ममता म्हणाल्या.
अंतर्गत सर्वेक्षणात TMCचं नुकसान -तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.
टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.