नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालाय. दरचम्यान, या प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'भाजप सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, फक्त हुकूमशाही कारभार येतो', असं त्या म्हणाल्या. तसेच, 'ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या घटनेवर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे राम राज्य आहे का किलिंग राज्य?' असा सवाल त्यांनी केला.
राज्य सरकारकडून मदतीची घोषणादरम्यान, या हिंसक संघर्षात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 45-45 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यासह आठ दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करण्याचा विश्वासही सरकारने व्यक्त केलाय.
नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर लखीमपूर येथे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसह इतर गाड्यांची जाळपोळ केली. हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातील विरोधी पक्षांकडून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.