TMC Mahua Moitra: लोकसभेच्या नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांनी तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरील समितीचा अहवाल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात सादर केला आहे. दिवाळीनंतर बिर्ला त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. यातच आता एकीकडे लोकसभेतून अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे महुआ मोइत्रा यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर विश्वास ठेवत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. याबाबत महुआ मोइत्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यामध्ये या नव्या जबाबदारीसाठी पात्र समजल्याबाबत महुआ मोइत्रा यांनी ममता बॅनर्जी यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.
तृणमूल काँग्रेस पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
तृणमूल काँग्रेस पक्षाने महुआ मोईत्रा यांची कृष्णनगर (नदिया उत्तर) जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. कृष्णनगर (नदिया उत्तर) परिसर महुआ मोइत्रा यांच्या लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. मला कृष्णानगर (नदिया उत्तर) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. कृष्णनगरच्या लोकांसाठी पक्षासोबत नेहमीच काम करेन, असे महुआ मोइत्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महुआ मोइत्रा यांच्यासह तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये १५ जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, लोकसभेच्या नैतिकता समितीने दिलेल्या महुआ मोइत्रा यांच्या अपात्रतेच्या प्रस्तावाचे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. महुआ मोइत्रा यांना त्यांच्याच मतदारसंघातील जिल्ह्याचा कार्यभार देण्याच्या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष त्यांना सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानतो, असा स्पष्ट संकेत देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.