जमुई: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लहरी स्वभावाचे आहेत. ते कधी भाजपच्या नेतृत्वातील NDA मध्ये येतात तर कधी काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA/INDIA आघादीत जातात. काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी ते इंडिया आघाडीशी फारकत घेत एनडीएमध्ये सामील झाले. ते कधीही भाजपची साथ सोडू शकतात, अशी चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात रंगते. पण, यापुढे भाजपची साथ सोडणार नसल्याचे नितीश कुमारांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी जमुई येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी गौरव दिन सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 6,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पीएम मोदींना आश्वासन दिले की, ते यापुढे भाजपची साथ सोडणार नाहीत.
उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, "मधल्या काळात चूक झाली, आमच्या काही लोकांमुळे हे घडलं. पण, आम्ही आता ठरवलंय की, यापुढे कुठेही जाणार नाही. आम्ही 1995 पासून एकत्र आहोत आणि तेव्हापासून एकत्र काम करत आहोत. आम्ही अटलबिहारी वाजपेयींसोबत त्यांच्या सरकारमध्ये होतो. आता यापुढे कधीही इकडे तिकडे जाणार नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केलं आहे, असंही नितीश कुमार यावेळी म्हणाले.