Omar Abdullah Meet Amit Shah : नुकत्याच पार पडलेल्या जम्मू-काश्मीर () विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाले. दरम्यान, या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आज( बुधवारी, 24 ऑक्टोबर 2024) नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली.
केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या निर्वाचित सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरच्या सध्याच्या सुरक्षा आणि विकासाच्या परिस्थितीवर गृहमंत्र्यांशी चर्चा करण्याव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाचीही माहिती दिली. दरम्यान, ओमर अब्दुल्लांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली असून, ते आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
ओमर अब्दुल्ला बुधवारी दुपारीच श्रीनगरहून दिल्लीला रवाना झाले होते. ओमर अब्दुल्ला यांनी दुजोरा दिला नसला तरी, त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, ओमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्र्यांसोबत जम्मू-काश्मीर आणि काश्मीरमध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमित निधी मिळण्याबाबत चर्चा केली. याशिवाय, हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात सर्वत्र बर्फ पसरतो, अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सहकार्याची विनंती केली आहे.
बैठकीनंतर ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ठरावाचीही अमित शाहांना माहिती दिल्याचे ओमर यांनी सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीरच्या लोकांना आशा आहे की, केंद्र सरकार या संदर्भात दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण करेल. श्रीनगर-बनिहाल-कटरा-जम्मू-दिल्ली रेल्वे कनेक्टिव्हिटी लवकर पुनर्संचयित करणे आणि झेड मॉड टनेल प्रकल्पाच्या उद्घाटनाशी संबंधित समस्याही त्यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.