नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. केंद्र सरकारने शनिवारी १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये २३ महिलांचा समावेश आहे. तर मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या १३ व्यक्ती आहेत. दरम्यान, या पद्म पुरस्कारांबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची नाराजी समोर आली आहे. त्यांनी आपल्या राज्यावर भेदभाव केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.
राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी दिलेल्या नावांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच, यासंदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचा विचार करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, हा 'भेदभाव' तेलंगणातील लोकांचा अपमान आहे.
दरम्यान, पद्म पुरस्कार देण्यासंदर्भात तेलंगणा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अनेक व्यक्तींची नावे पाठवली होती. शिफारस केलेल्या नावांमध्ये लोक गायक आणि गीतकार गद्दार (पद्मविभूषण), शिक्षणतज्ज्ञ चुक्का रमैया (पद्मभूषण), कवी अँडी श्री (पद्मभूषण), कवी आणि गायिका गोराती वेंकन्ना (पद्मश्री) आणि कवी आणि इतिहासकार जयधीर तिरुमला यांचा समावेश आहे. मात्र, केंद्राने त्यांचा विचार केला नाही, हे तेलंगणाच्या ४ कोटी लोकांचा 'अपमान' असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांसाठी १३९ लोकांची निवड केली असली, तरी तेलंगणातील शिफारस केलेल्या पाच जणांची निवड करण्यात आली नाही, त्याबद्दल मु्ख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ज्यामध्ये अभिनेता बालाकृष्ण, डॉक्टर नागेश्वर रेड्डी आणि मंदा कृष्णा मडिगा यांचा समावेश आहे. रेवंत रेड्डी म्हणाले की, पुरस्कारांसाठी त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणाकेंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर या तीन मान्यवरांसह १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर मारूती चितमपल्ली, विलास डांगरे, चैतराम पवार यांच्यासह देशभरातील ३० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.