“मी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवे की नको?”; शिवराज सिंह चौहान यांची भररॅलीत जनतेलाच साद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 04:58 PM2023-10-07T16:58:41+5:302023-10-07T16:59:00+5:30
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan: पुढील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असणार नाहीत, असा दावा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला होता.
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापताना दिसत आहे. मध्य प्रदेशचा गड राखण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, भाजपला चितपट करण्यासाठी इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. सभा, रॅली हळूहळू वाढताना दिसत आहेत. यातच एका रॅलीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट जनतेलाच साद घातली आणि मी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवे की नको, अशी विचारणा केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सर्वोच्च पदावरून पायउतार होतील, असे काँग्रस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांनी जनतेलाच थेट विचारणा केली. मला तुम्हाला विचारायचे आहे की मी चांगले सरकार चालवत आहे की वाईट. त्यामुळे या सरकारने पुढे जावे की नाही? मी पुढे जावे का? मी मुख्यमंत्री व्हावे की नाही? नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान राहायचे का आणि भाजपने सत्ता टिकवायची का, असे काही सवाल उपस्थित जनतेला संबोधित करताना केले. याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत
प्रियंका गांधी यांनी एका सभेला संबोधित करताना शिवराज सिंह चौहान हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. पंतप्रधान मोदी इथे येतात. मात्र, ते शिवराज सिंह चौहान यांचे नाव घेण्यास टाळाटाळ करतात. फक्त शिवराज सिंह चौहान यांचे नाव केवळ मते मागण्यासाठी करतात. आता शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होणार नाही, असा मोठा दावा प्रियंका गांधींनी केला होता.
दरम्यान, २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेसाठी वर्षाच्या अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपने आतापर्यंत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच इंदूरचे दिग्गज कैलाश विजयवर्गीय यांच्यासह ७९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.