मध्य प्रदेशातील 'ही' दोन शहरं पवित्र क्षेत्र म्हणून घोषित; मांस-मद्यविक्रीवर असणार बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:08 PM2022-02-22T18:08:05+5:302022-02-22T18:09:28+5:30
Madhya Pradesh : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 285 किमी अंतरावर असलेल्या दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर (Kundalpur) येथे जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.
भोपाळ : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूरसह (Kundalpur) दोन शहरांना 'पवित्र क्षेत्र' म्हणून घोषित केले असून याठिकाणी मांस (Meat) आणि मद्य (Liquor) विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 285 किमी अंतरावर असलेल्या दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर (Kundalpur) येथे जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पवित्र शहरांची घोषणा केली.
आचार्य विद्यासागर (जैन साधू) महाराज यांच्या प्रेरणेने मी कुंडलपूर आणि बांदकपूर ही शहरे पवित्र क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे याठिकाणी आता मांस आणि मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असेल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. दरम्यान, बांदकपूर शहर हे शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
याचबरोबर, विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम वर्षभरात हिंदीतून सुरू करणार आहे. तसेच नागरिकांनी गायींच्या रक्षणाच्या कामात पुढे यावे आणि चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावावीत, असे आवाहनही शिवराज सिंह चौहान यांनी केले.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले होते की, राज्य सरकार पुढील शैक्षणिक सत्रापासून भोपाळ येथील गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हिंदीत एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.