“असा ‘भाऊ’ तुम्हाला परत मिळणार नाही, नसेन तेव्हा माझी खूप आठवण येईल”: CM शिवराज सिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 10:33 PM2023-10-01T22:33:11+5:302023-10-01T22:36:01+5:30
CM Shivraj Singh Chouhan News: एका योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
CM Shivraj Singh Chouhan News: माझ्यासारखा भाऊ तुम्हाला परत मिळणार नाही. जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्हाला माझी खूप आठवण येईल. मी राजकारणाची व्याख्या बदलली. वर्षानुवर्षे काँग्रेसची राजवट तुम्ही पाहिली आहे. त्यांना जनतेची अशी चिंता कधी होती का? मी सरकार नाही कुटुंब चालवत आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. सिहोर जिल्ह्यातील विकासकामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी एका योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री चौहान बोलत होते.
मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने मध्य प्रदेश निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपसाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल
मध्य प्रदेशचे राजकारण बदलले आहे. तुमच्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला पैसे येतील असा तुम्ही कधी विचार केला होता का? दर महिन्याला पगाराप्रमाणे पैसे थेट खात्यात येतात. ही एक क्रांती आहे. सुरुवातीला १ हजार रुपये देण्यात येत होते. हळूहळू हा निधी ३ हजारांवर नेण्याचा मानस आहे, अशी ग्वाही शिवराज सिंह चौहान यांनी दिली. मुख्यमंत्री आवास योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. किती विकास कामे झाली? काँग्रेसच्या काळात असे कधी झाले होते का? आम्ही रस्त्यांचे जाळे राज्यभर विणले. याची सुरुवात करताना काय परिस्थिती होती हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
दरम्यान, आता आमचे उद्दिष्ट असेल की प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल. त्याला रोजगाराशी जोडले जाईल. उपजीविका अभियानाच्या माध्यमातून महिलांना दहा हजार मासिक उत्पन्न देण्याचे उद्दिष्ट आहे. मी व्यक्ती नसून सामाजिक क्रांती आहे, असे विधान शिवराज सिंह चौहान यांनी केले. माझ्याकडे पैसे नाहीत, कुठून आणू, काय करू, असे काँग्रेस नेहमी सांगत आली आहे. माझ्याकडे विकासासाठी पैशांची कमतरता नाही. मला स्वप्नात पाहून काँग्रेसवाले घाबरतात. अशा काँग्रेसचा पराभव करायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून शपथ घ्या आणि भाजपला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.