- गजानन चोपडे
जबलपूर : राज्यात भाजपाला चौथ्यांदा सत्ता मिळवायची असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा सरकारविषयीचा रोष भाजपाला महागात पडू शकतो, असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे राजकीय गुरू व ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी दिल्याने ‘मामा’ शिवराज सिंग चौहान यांच्या अडचणीत भर पडली आहे.व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. केळकर यांच्या मते पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी आणि सरकारविषयीचा रोष हे फॅक्टर भाजपाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे पक्षाने वेळीच पाऊल उचलणे आवश्यक आहे. पक्षाध्यक्षांप्रमाणे नगरसेवक, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाह केवळ दोनदाच संधी द्यायला हवी. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल.यापूर्वी मुख्यमंत्री चौहान यांच्याविषयी माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि माजी केंद्रीय मंत्री सरताज सिंग यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मतदानाला १० दिवस शिल्लक असताना संघाचे ज्येष्ठ प्रचारक केळकर यांचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपामध्ये यंदा बंडखोरांची मोठी फौज दिसत आहे. काहींची समजूत घालण्याचा प्रयत्न होत असला तरी ही मंडळी उमेदवारांच्या प्रचारात उतरलेली नाहीत. आतापर्यंत भाजपाने बंडखोरीमुळे राज्यातील ५३ स्थानिक नेत्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला बुधनी मतदारसंघात त्यांच्या पत्नी साधना सिंग व मुलगा कार्तिकेय यांच्या विरोधात सोशल मीडियावर रान उठल्याने मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यांच्या विरोधात आधी अर्जुन आर्य यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. मात्र वातावरण बदलत असल्याने काँग्रेसने येथून अरुण यादव यांना उतरवून नवीन व्यूहरचना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मतदारसंघाकडेही अधिक लक्ष द्यावे लागत आहे. बुधनीमध्ये शिवराज सिंंहांनी प्रचाराची धुरा पत्नी व मुलावर सोपविली होती. परंतु आता या दोघांनाच विरोधाचा सामना करावा लागत असल्याने काँग्रेसच्या आशा काहीशह पल्लवित झाल्या आहेत.राहुल गांधी यांनी प्रचारातव्यापंम घोटाळ्याला ‘स्कॅम आॅफ द सेन्च्युरी’ म्हणत शिवराज सिंग चौहानांना फैलावर घेतले आहे. शिवराज स्वत:ला ‘मामा’ म्हणत असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांची तुलना ‘कंस’ व ‘शकुनी’शी केली आहे. शिवराज यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह त्यांचे कौतुक करीत आहेत. शिवराज सिंग यांच्या कार्यकाळात राज्याचा जेवढा विकास झाला तेवढा काँग्रेस ४० वर्षात करू शकली नाही, असा दावा मोदींनी केल्याने भाजपात उत्साह आहे. मोदी आता २५ नोव्हेंबर या काळात १० सभा घेणार आहेत.‘व्यापमं’चा आरोपी रिंगणातदेशभरात गाजलेल्या व्यापमं घोटाळ्यातील एक आरोपी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बसपाने भिंडच्या गोहाद मतदारसंघातून डॉ. जगदीश सागर यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या तुलनेत डॉ. सागर सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सव्वा सात कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.