CM Siddaramaiah MUDA Case News : कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दणका दिला आहे. मुडा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच, जमीन घोटाळ्याप्रकरणी सिद्धरामय्या यांच्यावर खटला दाखल केला जाईल, असेही उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज निकाल हा दिला आहे.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जागा वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला मंजुरी दिली होती. राज्यपालांकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. मंगळवारी (24 सप्टेंबर 2024) कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि मुख्यमंत्र्यांची याचिका फेटाळून लावली.
वैयक्तिक तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्याची परवानगी देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अशा स्थितीत सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसऱ्या पक्षाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, लोकायुक्तांच्या कारवाईवर ते समाधानी नसतील, तर ते सीबीआय चौकशीची मागणी करतील. आता दिलासा न मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (25 सप्टेंबर 2024) दुहेरी खंडपीठासमोर अपील करू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राजीनामा देणार नाहीमुख्यमंत्र्यांनी दुहेरी खंडपीठात अपील केल्यास, या याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी स्थगित करण्यासाठी अपील करता येईल. दुहेरी खंडपीठाने ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारल्यास सिद्धरामय्या यांना दिलासा मिळणार आहे. दुहेरी खंडपीठातूनही दिलासा न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील आणि तोपर्यंत सिद्धरामय्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.