Udaynidhi Stalin Statement: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्य सरकारमध्ये क्रिडा मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यावरुन तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत गदारोळ सुरू झाला आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया, डेंग्यू अन् कोरोनाशी केली आणि याला संपवायला पाहिजे, असे असे म्हटले. भाजपने या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे, तर काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. तसेच, आरजेडीने या विधानाबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.
भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, 'राहुल गांधी प्रेमाच्या दुकानाविषयी बोलतात, पण काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकचे वंशज सनातन धर्म नष्ट करण्याविषयी बोलतात. काँग्रेसचे मौन हे नरसंहाराच्या या आवाहनाचे समर्थन आहे. आज I.N.D.I.A. आघाडीचा भारतविरोधी आणि हिंदुविरोधी चेहरा उघड झाला आहे. I.N.D.I.A. आघाडीला संधी मिळाली, तर ते हजारो वर्षे जुन्या सनातन धर्माला नष्ट करतील.'
'द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन सनातनला केवळ विरोध करत नाहीत, तर त्याची तुलना रोगांशी करतात आणि त्याचा नाश करू इच्छितात. म्हणजेच ते सनानत धर्माला संपवण्याची भाषा करतात. 80 टक्के लोक ज्या धर्मात आहेत, तो धर्मा ह्यांना संपवायचा आहे. त्या धर्मावर विश्वास ठेवणार्या लोकांना ह्यांना संपवायचे आहे. हा पक्ष विरोधकांच्या आघाडीत आहे आणि बऱ्याचच काळापासून काँग्रेसचा साथी आहे. यांनी मुंबईच्या बैठकीत यावर चर्चा केली होती का?' असा सवालही भाजपने विचारला आहे.
त्या वक्तव्यापासून काँग्रेस दूर
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याप्रकरणी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही धर्मावर भाष्य करू इच्छित नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत सर्व धर्मांना समानतेची भूमिका दिली आहे, तीच भूमिका आम्ही पाळतो. कोण काय म्हणेल, ते आपल्या हातात नाही,' असं नाना पटोले म्हणाले.
विधान मागे घ्यावे: राजदसनातन धर्मावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले. ते म्हणाले, "भाजपही सनातन धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. हा राजकारणाचा विषय नाही. असे वक्तव्य कोणी केले असेल, तर त्यांनी सनातन्यांची तत्काळ माफी मागावी आणि हे विधान मागे घ्यावे." दरम्यान, द्रमुकच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले की, उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला.