मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपासोबतची तब्बल अडीच दशकांहून जास्त काळ असलेली युती तोडत शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. या तीन पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन करत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेना केंद्र सरकारमधूनही बाहेर पडली. यामुळे शिवसेना आणि भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटतील.येत्या सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदींची सदिच्छा भेट घेऊन राज्यासाठी आर्थिक मदत मागू शकतात.मी पंतप्रधानांना भेटायला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच म्हटलं होतं. 'मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाणार आहे. माझ्या मोठ्या भावाची भेट घेणार आहे. कारण पंतप्रधान मोदी मला त्यांचा लहान भाऊ म्हणतात,' असं उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले होते.राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार आणि कोरेगाव भीमाच्या तपासाचा मुद्दादेखील गाजत आहे. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचंदेखील पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एल्गार प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करण्याची मागणी करताच केंद्रानं हे प्रकरण एनआयएकडे सोपवलं. याला मुख्यमंत्र्यांनीदेखील मंजुरी दिल्यानं शरद पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा वेगवेगळी प्रकरणं असून केवळ एल्गार प्रकरणाचा तपास केंद्रानं स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाची राज्य सरकारकडून समांतर चौकशी केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:17 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची शक्यता
ठळक मुद्देउद्या मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटण्याची शक्यताअर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी ठाकरे-मोदी भेटण्याची शक्यतामुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटणार