उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं.
"ओवेसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेस समाजाचं समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजपं आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकार करतो," असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आजतक या वाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागादेखील लढवणार आहे.
"त्यांनी म्हटलं आम्ही येऊ देणार नाही, तो भाजपही हे सांगेल की २०२२ च्या निवडणुकांमध्ये भाजपचं जिंकेल आणि भाजपचंच सरकार स्थापन होईल. ओवेसी यांचा स्वत:चा एक पक्ष आहे. ते आपल्या मुद्द्यांवर निवडणुका लढवतील आणि आम्ही आमच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू," असं योगी आदित्यनाथ म्हणाले. काही दिवसांपूर्वी ओवेसी यांनी ट्वीट करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये एमआयएम १०० जागांवर निवडणुका लढवणार असल्याचं म्हटलं होतं.