CM Yogi Adityanath: देशातील अनेक राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्येही विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. आम्ही दिलेला शब्द पाळला. मंदिर तिथेच बांधले, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले.
तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेथ यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत मोठा भ्रष्टाचार होत आहे. यापूर्वी असा भ्रष्टाचार कधी पाहिला नाही. अयोध्येत जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. भ्रष्टाचारासंदर्भात योगी सरकारचे कोणतेही धोरण नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला.
केवळ बोललो नाही, करून दाखवले; आम्ही वचन पाळले
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देताना सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना झाली. अयोध्येला गमावलेली गरिमा परत मिळाली. आम्हाला आनंद वाटतो की, आम्ही आमचे वचन पूर्ण केले. मंदिर तिथेच बांधले. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. गेली अनेक वर्षे अयोध्येवर अन्याय झाला. तेथील स्थानिकांवर अन्याय झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
काशी आणि मथुरा विसरू शकत नाही
पांडवांनी कौरवांकडे केवळ पाच गावांची मागणी केली होती. मात्र, ही मागणी कौरवांनी पूर्ण केली नाही. देशातील बहुसंख्य समाज केवळ तीन ठिकाणांची मागणी करत आहे. पैकी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात आले. आता काशी आणि मथुरा विसरता येणार नाही. ही गोष्ट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच व्हायला हवी होती. मात्र, व्होट बँकेच्या नावाखाली लोकांच्या आस्थेचा विचार करण्यात आला नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
दरम्यान, अयोध्येच्या विकासासाठी ३१ हजार कोटी रुपयांच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आता अयोध्येचे स्वरूप भव्य होत आहे. आधी कर्फ्यू लागल्यासारखी शांतता असायची आता मंगलगानाचे सूर कानी ऐकू येतात. जगभरातील लोक, पर्यटक आता अयोध्येत येत आहेत. अयोध्येला जगाची सांस्कृतिक राजधानी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कामकाज केले जात आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.