उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या आमदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. आमदार निधीत दोन कोटींची वाढ केली आहे. यानुसार उत्तर प्रदेशातील आमदारांना आता तीन कोटींऐवजी ५ कोटी रुपये आमदार निधी म्हणून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
काँग्रेसच्या आमदार आराधना मोना यांनी योगींकडे आमदार निधी वाढवण्याची मागणी केली होती. त्यास योगींनी सकारात्मक प्रतिसाद देत नवी घोषणा केली आहे. योगींनी आपल्या भाषणात यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला.
"राज्याचे विरोधी पक्षनेते एका बाजूला शेतकऱ्यांचं कौतुक करतात तर दुसऱ्या बाजूला त्यांना शेणाची दुर्गंधी दिसते. पण राज्यात आज शेणापासून अगरबत्ती आणि धूपबत्ती देखील तयार केली जात आहे. जर ते गौसेवा करणारे असते तर त्यांच्या भाषणात याचा नक्कीच उल्लेख असता", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांनी केली.