उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लहान भाऊ सुभेदार शैलेंद्र यांना काही महिन्यांपूर्वी सैन्यात मेजर या पदावर बढती मिळाली आहे. सुभेदार मेजर हे गढवाल रेजिमेंटमधील सर्वोच्च ऑफिसर पदावर कार्यरत आहेत. ते सध्या गढवाल रायफल्स रेजिमेंटल सेंटर लॅन्सडाउन येथे तैनात आहेत. खरं तर यापूर्वी ते उत्तराखंडमधील चीन सीमेजवळील माना येथे तैनात होते.
भारतीय सेना गढवाल स्काऊट युनिट डोंगररांगांचे रक्षण करण्यासाठी स्थानिक पुरुषांना सैनिक म्हणून भर्ती करते. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे ही सीमा अत्यंत महत्त्वाची ठरत असते. सुभेदार शैलेंद्र यांना बालपणापासूनच सैन्यात भर्ती होण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी स्काऊट गाईड्समध्ये सहभाग घेतला होता अन् पुढे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संपूर्ण कुटुंब साधे जीवन जगते. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह हे वन परिरक्षक होते आणि त्यांची आई सावित्री देवी या गृहिणी आहेत. चार भाऊ आणि तीन बहिणींमध्ये योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एक बहीण शशी पायल पौडी गढवाल येथील माता भुवेश्वरी देवी मंदिराजवळ चहा-नाश्त्याचे दुकान चालवते. यावरून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन किती सामान्य आहे याची कल्पना येते.