नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले. ते येथे केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. उद्या सकाळी 10:45 वाजता ते पंतप्रधान मोदी यांना, तर 12:30 वाजता जेपी नड्डा यांना भेटतील. आज मुख्यमंत्री योगींनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (CM Yogi Adityanath delhi visit PM Narendra Modi Amit shah JP Nadda meeting)
यातच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही बैठक विशेष मानली जात आहे. उद्या योगी या दोन्ही नेत्यांना भेटतील. मात्र, यापूर्वीच जेपी नड्डा पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
योगींनी घेतली अमित शाहंची भेट - दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी दिल्लीतील युपी भवनात गेले. येथे काही वेळ थांबल्यानंतर, ते गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानी गेले. येथे दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास चर्चा झाली. ते उद्या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. सांगण्यात येते, की भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरेल. याच बरोबर उत्तर प्रदेश संघटन आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही चर्चा होऊ शकते. याच वेळी एके शर्मा यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो.
दिल्लीश्वरांसमोर योगी आदित्यनाथांनी दंड थोपटले, पुढे...?
अनुप्रिया पटेल यांनीही घेतली शाहंची भेट - एनडीएचा घटक पक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनीही आज गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर, खासदार अनुप्रिया पटेल यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. या बैठकीकडेही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टाने पाहिले जात आहे.
रात्री उशिरापर्यंत स्वतंत्रदेव सिंह आणि सुनील बंसल यांच्याशी बैठक -सीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, ही दर महिन्याला होणारी रुटीन बैठक होती, असे सांगण्यात आले. पण, या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.
दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'
ही बैठक आणि सध्या लावले जात असलेले राजकीय कयास, यांसंदर्भात माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, गेल्या एक महिन्यातील घटनाक्रमासंदर्भात बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे. यातच नुकताच, भाजप आणि आरएसएसच्या काही मोठ्या नेत्यांनीही लखनौ दौरा केला आहे.